दृष्टी न्यूज :सुधीर घाटाळ वाणगाव, ११ एप्रिल २०२५:शिवसेना डहाणू तालुका संघटक, युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आणि ख्यातनाम समाजसेवक अँड. विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या या उपक्रमाचे आयोजन युवा एल्गार आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती सुरेंद्र पाटील, अरविंद कंसारा, पोलीस कर्मचारी कनोजा, अँड. निलेश राऊत, निलेश कासट, नंदकुमार लिलका, प्रकाश पाटकर, अशोक शिंगाडा, माधव तल्हा, डॉ. स्वनिल गडग, छेडा ब्लड बँकेचे डॉ. विजय महाजन, स्वरा डायग्नोस्टिकचे प्रफुल्ल वैद आणि इन्फिगो आय केअरचे प्रतिनिधी तसेच युवा एल्गार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाठे, उपाध्यक्ष रोहित किणी, रघु वारंगडे, साईनाथ धांगडा, तुलसी गडग, अनुफ पाटील, स्वप्नील बारी, विलास सुमडा, सचिन कोम, रुपेश तल्हा आदी मान्यवर उपस्थित होते.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वाणगाव येथील युवा एल्गार आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडले. या कालावधीत २० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर अनेक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी, हिमोग्लोबिन आणि इतर आरोग्य तपासण्या करून घेतल्या.

या उपक्रमात विशेषतः गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनात युवा एल्गार आघाडीचे कार्यकर्ते, स्थानिक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
अँड. विराज गडग हे गेल्या १५ ते १७ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य करत आहेत. विधवा, निराधार, अपंग आणि वृद्ध नागरिकांसाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या असून शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, मार्गदर्शन, तसेच शासकीय दाखल्यांचे वाटप यासारख्या उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय असतात.आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे हे ओळखून युवा एल्गार आघाडीने पुढाकार घेतल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

“माझा वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजासाठी काहीतरी मूल्यवान देण्याची संधी आहे. म्हणूनच दरवर्षी तो सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अर्थपूर्ण बनवण्याचा मी संकल्प केला आहे.”
अँड.विराज गडग :संस्थापक अध्यक्ष – युवा एल्गार आघाडी,संघटक-डहाणू(पालघर विधानसभा क्षेत्र)शिवसेना

“विराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ते चळवळीचे आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व असलेले कार्यकर्ता आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने समाजासाठी काम करत आहेत. त्यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. विराजच्या प्रत्येक सामाजिक लढ्याला माझा पाठिंबा कायम राहील.”
कुंदन संखे, सभेचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना पालघर
