राजेश कासट यांचे परिवहन मंत्र्यांकडे लेखी निवेदन; शाळेचे बांधकाम सुरू, जागा मोकळी
दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू 9 एप्रिल 2025 विक्रमगड तालुक्यातील मुरबाड येथील शासकीय आश्रमशाळा, येथून २००७ साली काही प्रकल्पाच्या अडचणीमुळे सूर्यनगर येथे स्थलांतरित करण्यात आली होती, ती आता पुन्हा मूळ ठिकाणी म्हणजेच मुरबाड येथे स्थलांतरित करावी, अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख राजेश कासट यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
राजेश कासट यांनी निवेदनात नमूद केले आहे की, मुरबाड येथे शाळेसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध असून, गट क्रमांक ३५५ (०.४०० हेक्टर) आणि गट क्रमांक ३५६ (२.३४०० हेक्टर) या एकूण २.७४ हेक्टर क्षेत्रावर सध्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण नाही, त्यामुळे शाळेच्या मूळ ठिकाणी स्थलांतरित करण्यात कोणताही अडथळा राहिलेला नाही.
या मागणीला स्थानिक ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, गावात या निर्णयाला वाढता पाठिंबा मिळत आहे. स्थानिक पातळीवर शाळेच्या पुनर्स्थापनेसाठी उत्सुकता वाढत असून प्रशासनाने लवकरच निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, कासट यांनी संबंधित विभागाने मुरबाडमधील उपलब्ध जागेची आणि सुरू असलेल्या शासकीय इमारतीच्या कामाची सखोल पाहणी करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.

“सध्या शाळा सूर्यनगर येथे कार्यरत असली तरी शाळेचे शासकीय नाव व मूळ जागा मुरबाड येथीलच आहे. मुरबाड ते सूर्यनगर हे ८-९ किलोमीटरचे अंतर दररोज पार करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी या प्रवासात एका विदयार्थ्यांनीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे शाळा गळतीची शक्यताही नाकारता येत नाही. शासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन शाळेचे पुनर्स्थापन मुरबाडमध्ये करावे, हीच आमची मागणी आहे.”
राजेश कासट, उप तालुका प्रमुख, शिवसेना (डहाणू)
