दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्रोत्सवाला १२ एप्रिल रोजी भव्य सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी, सुळका डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी अपघाताने वातावरणावर शोककळा पसरली.
१२ एप्रिलच्या मध्यरात्री, महालक्ष्मी यात्रेच्या पारंपरिक ध्वजारोहणाची विधी पार पडली. रात्री बारा वाजता महालक्ष्मी मंदिरातून पूजाअर्चा करून पुजाऱ्यांच्या हस्ते ध्वज सुळका डोंगराच्या शिखरावर नेण्यात आला. यावेळी स्वयंसेवक, पोलिस दल आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती. विधीपूर्वक ध्वज बदलल्यानंतर यात्रेचा धार्मिक कार्यक्रम औपचारिकरीत्या सुरू झाला.

मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास काही उत्साही भाविकांनी सुळका डोंगराच्या टोकावर जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार ते पाच तरुण सहभागी होते. त्यांनी महालक्ष्मी गडावरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर आणखी उंचावर चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी चढताना पाय घसरल्याने एका भाविकाचा खोल दरीत पडून जागीच मृत्यू झाला.
या भाविकाचे नाव मेरीक कन्हैयालाल कांचवाला (वय ३८, रा. सुरत, गुजरात) असे असून ते महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी खास सुरतहून आले होते. खोल दरीत पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचली आणि शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यात आला.

यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह कांचवाला यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्घटनेमुळे यात्रोत्सवात सहभागी असलेल्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी भाविकांना पर्वतरांगेत योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, डोंगरावर अत्यंत काळजीपूर्वक आणि स्थानिक मार्गदर्शकांच्या मदतीनेच जाण्याचे निर्देश दिले आहेत.

