दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू: डहाणू तालुक्यातील वाणगाव मुख्य रस्त्यावर पिंपळशेत(खुर्द) परिसरात मोठा खड्डा पडलेला असून, रस्त्याचा एक भाग पूर्णतः खाली बसलेला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सदर खड्डा दिवसेंदिवस अधिक खोल व रुंद होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणावर करतात. रस्ता अरुंद झाल्यामुळे दोन वाहने समोरासमोर येताना चालकांना मोठी अडचण भासत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस आणि पावसाळ्यात या खड्ड्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
खड्ड्याजवळ ना कुठली चेतावणी पाटी आहे, ना कुठले सुरक्षा कुंपण. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.या रस्त्यावर वेळोवेळी डांबरीकरण केले जात असले तरी दर्जाहीन कामामुळे काही महिन्यांतच रस्त्यांची हीच अवस्था होते. त्यामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

तत्काळ खड्डा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच वाहतुकीसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ, पालक व वाहनचालक करत आहेत. अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
“या मुख्य रस्त्यावर खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सध्या यात्रेचा काळ सुरू असल्यामुळे या मार्गावर यात्रेकरूंची ये-जा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीत अपघात होणे नक्कीच नाकारता येत नाही. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने त्वरित दखल घेणे आवश्यक आहे, अन्यथा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू.”
सुदाम मेरे, उपसरपंच निकणे
“रोज शाळेतील लहान मुलं या रस्त्यावरून प्रवास करतात. खड्डा जिथे पडलेला आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती आणि संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे जबाबदारीने लक्ष देणे गरजेचे आहे. खड्डा बुजवण्यासाठी आम्ही लवकरच रस्ता रोको आंदोलनाचे आवाहन करणार आहोत.”
अजय घाटाळ, ग्रामपंचायत सदस्य, निकणे
