दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू (दि.19 एप्रिल): धाकटी डहाणू येथील दक्ष सागर मर्दे (वय १५ वर्षे) या अल्पवयीन मुलाचा महालक्ष्मी येथील सारणी पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. दक्ष महालक्ष्मी यात्रेसाठी कुटुंबासोबत गेलेला असताना, पाटामध्ये आंघोळ करण्यासाठी उतरला होता. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनेनंतर काही वेळ त्याचा मृतदेह सापडला नव्हता. शोधकार्य अधिक प्रभावीपणे पार पडावे यासाठी प्रशासनाने तत्काळ पाटाचे पाणी बंद केले. दक्षच्या कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली. अखेर रात्रीच्या सुमारास पाटाच्या पाण्याच्या प्रवाहात दक्षचा मृतदेह आढळून आला.दरम्यान, याच पाटामध्ये बाहेरून आलेले अनेक पर्यटक दोरीच्या साहाय्याने आंघोळ करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. पाण्याचा प्रवाह, खोलीचा अंदाज न येणे, गर्दीचा ताण या सर्व बाबी अत्यंत धोकादायक ठरत आहेत.
त्यामुळे भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पाटाचे पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
