दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
छत्रपती संभाजीनगर येथे १८ एप्रिल रोजी ‘फा हियान कराटे डो असोसिएशन’ व नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत डहाणूतील कराटेपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या डहाणूतील ११ विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट करत जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
या स्पर्धेत अद्विता सगळे, तनुषा भोये व खुशी कुवर यांनी प्रत्येकी २ सुवर्ण पदके व आकर्षक चषक पटकावले. प्रीत पटेल यांनी १ सुवर्ण व १ रजत पदकासह चषक जिंकले, तर कुशल ठाकूर व वृद्धी वळवी यांनी १ सुवर्ण, १ कास्य पदक व आकर्षक चषक मिळवले. समृद्धी वळवी व विहान कलंगडा यांनी १ सुवर्ण, १ रजत पदकासह चषक जिंकले, तर आयुष कलंगडा याला २ रजत पदके, कृती पटेलला १ रजत व १ कास्य पदक आणि ज्योत दळवीला २ कास्य पदके मिळाली. सर्व खेळाडूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून शिहान अरुण पाईकडे, डॉ. प्रशांत हॉर्शिल व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ उपस्थित होते. त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व खेळाडूंना डहाणूतील आगर नानी माता मंदिर मैदान व सेकंड पेट्रोल पंपजवळील जोशी नगर येथे नियमित कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. या यशामागे प्रमुख प्रशिक्षक सेन्साई कैलास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांना महाराष्ट्र खेल पुरस्कार, सुवर्ण लक्ष स्पोर्ट्स अवॉर्ड, इंटरनॅशनल मार्शल आर्ट पुरस्कार तसेच आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डहाणूतील या खेळाडूंनी राज्य पातळीवर आपल्या कुशलतेचे दर्शन घडवत स्थानिक स्तरावरून राष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल सुरू केली असून त्यांचे हे यश भविष्यातील कराटेपटूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
