दृष्टी न्यूज जितेंद्र टोके
पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली साठी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या माध्यमातून २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी दिनांक २२ एप्रिल २०२५ पासून २५ मे २०२५ या कालावधीत प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू येथून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरून त्याच कार्यालयात वरील वेळेत आणि सुट्टीचे दिवस वगळूनच सादर करावे लागतील. अंतिम मुदत २५ मे २०२५ असून त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अथवा अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
या प्रवेशासाठी पुढील मुख्य अटी अनिवार्य आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थी तलासरी, डहाणू, पालघर आणि वसई तालुक्यांत रहिवासी असावा. विद्यार्थ्याचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी ६ वर्ष पूर्ण असावे. विद्यार्थ्यांचे पालक शासन अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसावेत. शाळा निश्चितीनंतर कोणत्याही कारणास्तव बदल करता येणार नाही, याबाबत पालकांनी हमीपत्र द्यावे.
या प्रवेशासाठी लागणाऱ्या अर्जासोबत पुढील आवश्यक कागदपत्रे जोडवयाची आहेत. ज्यामध्ये पालकांचा जातीचा दाखला व रहिवासी दाखला असणे अनिवार्य आहे. दारिद्र्य रेषेखालील दाखला (असल्यास), उत्पन्नाचा दाखला (रु. 1 लाख मर्यादेपेक्षा कमी), जन्म प्रमाणपत्र किंवा अंगणवाडी दाखला, विद्यार्थी व पालकांचे आधारकार्ड, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, पासपोर्ट साईझचे 2 फोटो, विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या महिला असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला या बाबी पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रवेशप्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सर्वासमक्षरित्या पार पडणार असून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन विकास प्रकल्प विभागाने केले आहे. शासन स्तरावरून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार असून तोपर्यंतची प्रक्रिया मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहील. या उपक्रमाचा लाभ घेत जास्तीत जास्त विद्यार्थी प्रवेशासाठी पुढे यावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू जि. पालघर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
