दृष्टी न्यूज शैलेश तांबडा
तलासरी, ता. ६ मे तलासरी तालुक्यातील झरी येथील ज्ञानमाता सदन संस्थेच्या ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालयाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची घवघवीत कामगिरी करत सलग १२ वर्षांच्या कालावधीत ८ वेळा विज्ञान शाखेचा १००% निकाल लावून तालुक्यात मानाचं स्थान प्राप्त केलं आहे. ही कामगिरी आदिवासी भागातील शिक्षणाच्या क्षेत्रातील एक प्रेरणादायी यशगाथा ठरते.

या यशामागे ज्ञानमाता सदन संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, डहाणू, तसेच शाळेचे कुशल नेतृत्व करणाऱ्या प्राचार्या सि. बस्तियान यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन व अथक प्रयत्न यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संपूर्ण शिक्षकवृंदांनी घेतलेले परिश्रम, तंत्रस्नेही अध्यापनपद्धती, शाळेतील शिस्तप्रिय आणि विद्यार्थीहितकारी वातावरण यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

शाळेच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक शिक्षणाची सुविधा तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम हे सर्व घटक शैक्षणिक दर्जा उंचावण्यास सहायक ठरले आहेत.
या उत्कृष्ट निकालाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, प्राचार्या तसेच शिक्षकवृंदांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाळेच्या या यशाचे स्वागत करत हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त केले आहे.
संस्थेचा उद्देश केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणेच नाही, तर आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सशक्त व स्पर्धाक्षम बनवण्याचा आहे, ही बाब शाळेच्या प्रत्येक यशातून अधोरेखित होते.

ज्ञानमाता आश्रमशाळेचा हा आदर्शवत निकाल इतर संस्थांसाठी प्रेरणादायक ठरत असून आदिवासी भागातही राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता निर्माण करता येते, हे सिद्ध करणारा हा एक उत्कृष्ट नमुना आहे
