रुग्णांची व नातेवाइकांची प्रचंड गैरसोय, प्रशासनाचा थेट निषेध
दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यातील कासा येथील उपजिल्हा रुग्णालय सध्या भीषण अस्वच्छतेच्या समस्येला तोंड देत असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अत्यंत खराब स्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत या रुग्णालयातील बाथरूम्सची दयनीय अवस्था, पाण्याचा अभाव, आणि दुर्गंधी यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
बाथरूममध्ये साचलेले गढूळ पाणी, चोकअप झालेले शौचालय , आणि स्वच्छतेचे कोणतेही साधन नसणे ही अवस्था रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका पोहचवते. पिण्याचे पाणी पुरवणारे युनिटदेखील बंद अवस्थेत असून, नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. महिलांसाठी असलेल्या बाथरूमची परिस्थिती अधिकच बिकट असून, तेथे बादली, मग वा पाण्याचा थेंबही उपलब्ध नाही.रुग्णालयातील तुटलेले नळ, गंजलेले पाइप, खराब झाडू-बादल्या आणि बेसिनमध्ये साचलेली घाण यामुळे साफसफाईच्या कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे स्पष्ट होते.

या परिस्थितीमुळे रुग्णांचे मनोबल ढासळत असून, त्यांना अपमानास्पद आणि त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

कासा उपजिल्हा रुग्णालयातील या विदारक दृश्यामुळे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णांचे आरोग्य धोक्यात असून, तात्काळ सुधारणा न झाल्यास स्थानिक नागरिकांन मध्ये व रुग्णांना मध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.प्रशासन च्या हलगर्जी पणामुळे याचा त्रास रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकाला होत आहे.याची प्रशासनने तात्काळ दाखल घ्यावी अशी जोरदार मांगणी होत आहे.

सरकारी रुग्णालयातील शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था ही रुग्णांच्या आरोग्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठी धोकादायक आहे. अशा अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. प्रशासनाने त्वरित स्वच्छतेच्या उपाययोजना करून नागरिकांना सन्मानपूर्वक सुविधा द्याव्यात.
संजू बोबा (सामाजिक कार्यकर्ता, धानिवारी)
नळात पाणी नाहीच, पण नळही तुटलेले आहेत. साफसफाई वेळेवर केली जात नाही. संपूर्ण रुग्णालयात अस्वच्छता आहे आणि पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही. बाथरूमची भांडी चोकअप झालेली आहेत.
रामदास गोरवला, रुग्ण
