पालघर जिल्ह्यातील आदिवासी लेखकाचा नवा साहित्यप्रवास चर्चेत
दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
कासा, ता. डहाणू – दि. ७ मे २०२५ पालघर जिल्ह्यातील कासा गावचे रहिवासी, आदिवासी खगोल अभ्यासक व लेखक म्हणून ओळख निर्माण केलेले श्री. चंद्रकांत घाटाळ यांचे सहावे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. विज्ञानकथांच्या माध्यमातून वाचकांना माहिती आणि मनोरंजनाचा संगम देणारे हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हे नवीन पुस्तक विज्ञानकथा संग्रह असून, त्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) या आधुनिक आणि सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या विषयावर आधारित विविध रहस्यमय कथा आहेत. या कथांद्वारे वाचकांना विज्ञान, कल्पना आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.सदर पुस्तक समीक्षा प्रकाशन, पंढरपूर यांनी प्रकाशित केले असून, पुस्तकाची किंमत १२० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. सहजसोप्या भाषेत लिहिलेल्या या कथा तरुण व प्रौढ वाचकांना विज्ञानाची गोडी लावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जव्हार महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. सुधीर भोईर यांनी लेखकाचा परिचय देताना म्हटले आहे की,
“चंद्रकांत घाटाळ यांनी विज्ञानाशी जोडलेली परंपरा पुढे नेली आहे. विज्ञानकथा लिहिताना त्यांनी केवळ माहितीच दिली नाही, तर त्या कथांना रहस्य आणि कुतूहलाची रंगत दिली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना निश्चितच आवडेल.”चंद्रकांत घाटाळ यांचे याआधी प्रसिद्ध झालेली पाच पुस्तकेही समाजात लोकप्रिय ठरली असून, त्यांच्या नव्या पुस्तकाबाबत वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
