प्रतिनिधी:शैलेश तांबडा
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आच्छाड परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामात अनागोंदीमुळे एक विचित्र प्रकार घडला. २ एप्रिल रोजी एका दुचाकीस्वाराने अनवधानाने ओल्या काँक्रिटवर दुचाकी चढवल्याने त्याची दुचाकी रस्त्यात रुतली. ही धडपड संपूर्णपणे कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
दुचाकीची चाके जवळपास एक फूट खोल रुतली होती. दुचाकी बाहेर काढण्यासाठी संबंधित युवकाला चांगलीच कसरत करावी लागली. या प्रकारामुळे महामार्गावरील कामकाजाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.सध्या आच्छाड परिसरात गुजरात वाहिनीच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, योग्य सूचना फलक, सुरक्षा यंत्रणा आणि रस्त्यावरील अडथळे नसल्यामुळे वाहनचालक दिशाभूल होऊन अशा घटना घडत आहेत.महामार्गावरील मनोर, तलासरी, मेंढवण, चारोटी, सावरोली, आंबोली आदी भागातही सेवा रस्त्यांची आणि मुख्य रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ओल्या काँक्रिटवर वाहनं चढवली गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडत असून अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रबंधक सुमित कुमार यांनी सांगितले की, “ओल्या काँक्रिटमध्ये खड्डे निर्माण झाल्याने संबंधित कंत्राटदारांना दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच सुरक्षा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.”
