दृष्टी न्यूज सुधीर घाटाळ
डहाणू तालुक्यातील विवळवेढे (महालक्ष्मी) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नितेश भोईर यांचा संशयास्पद अपघात झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटे घडली. यात्रेतील कामकाज आटोपून घरी परतत असताना भोईर हे निर्मनुष्य रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ही घटना पहाटे ४.१५ ते ४.३० च्या सुमारास घडली. भोईर यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या वापी (गुजरात) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते अद्यापही बेशुद्ध अवस्थेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या घटनेविषयी पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू असून, हा केवळ अपघात नसून पूर्ववैमनस्यातून घडलेला हल्ला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. घटनेनंतर विवळवेढे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यात्रेसारख्या मोठ्या सार्वजनिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडून यापुढे अधिक कडक सुरक्षा व्यवस्था आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलिस अधिक तपास करत असून लवकरच या घटनेमागील कारण आणि माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसमोर आता या घटनेतील सत्य उजेडात आणण्याचं मोठं आव्हान आहे.

“जी घटना घडली आहे ती अत्यंत भयावह आहे. यापूर्वी अशा घटना राज्यात घडल्या होत्या. मात्र आता ग्रामीण भागातही अशा घटना होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही जवळपास ४५ सरपंच एकत्र येऊन नितेश भोईर यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. सर्व सरपंच हॉस्पिटलला भेट देतील आणि नंतर एक विशेष बैठक घेऊन या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल. लवकरात लवकर संशयित आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा सर्व सरपंच एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील.”
किशोर कडू सरपंच परिषद अध्यक्ष
